Advance Salary : नमस्कार मित्रांनो! आपल्याला माहीत आहे की, या वर्षी गणेशोत्सवाची सुरुवात दि. २७ ऑगस्ट, २०२५ पासून होत आहे.
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणारे माहे ऑगस्ट, २०२५ चे वेतन / निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
State Employee Advance Salary
शासन निर्णयातील परिच्छेद १ (८) मधील तरतूद शिथील करुन, दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट, २०२५ या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्तीवेतनाचे / कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २६ ऑगस्ट, २०२५ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहेत.
वेतन देयकांचे आणि निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन देयकांचे प्रदान दि. २६ ऑगस्ट, २०२५ या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन / निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन देयके यथास्थिती संबंधित उप कोषागार कार्यालय /जिल्हा कोषागार कार्यालय / अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे त्वरीत सादर करण्याची दक्षता घ्यावी.
सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे / कृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी / कर्मचारी, तसेच निवृतवेतनधारक / कुटुंब निवृतवेतनधारक यांना देखील लागू होतील.
संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उप कोषागार कार्यालये यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०८२११६५३०१६५०५ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.