Swadhar Scholarship : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर मागासवर्गीय मुलामुलींच्या शिक्षणासाठी एकूण ४४३ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.
मुलांसाठी २३० व मुलींसाठी २१३ शासकीय वसतिगृहे सुरू असून, त्यापैकी मुलांच्या वसतिगृहामध्ये २३,२०८ विद्यार्थी प्रवेशित असून,मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये २०,६५० याप्रमाणे एकूण ४३,८५८ विद्यार्थी शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेत आहेत. सदर वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विहित अटी व शर्तीनुसार प्रवेश देण्यात येतो.
प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास,भोजन,शैक्षणिक साहित्य व दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता व आवश्यक सोयी-सुविधा दिल्या जातात.राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणे शक्य होत नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सुरु करुन तेथे प्रवेश देण्यासाठी जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात.
सबब, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्याना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरीता शासनाने दि. ६ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” सुरु केलेली आहे.
सदर योजनेंतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात / शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना भोजन, निवास, शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता, व इतर आवश्यक सोयी-सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात (Aadhar Linked Bank Account) थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
सदरील रक्कमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु.५,०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.२,०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना निकष
अ) मुलभूत पात्रता
१. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
२. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
३. शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
४. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा.
५. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
६. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रीयेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
सदर अट ही ज्या महानगर / शहरांमध्ये वसतीगृहांची संख्या एका पेक्षा अधिक असल्यास त्या महानगर/शहरांमधील सर्व वसतीगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेवून वसतीगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील, त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरीत पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
७. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्याने अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील.
८. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
९. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
१०. विदयार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या- ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा त्या-त्या प्रमाणे लागू राहील.
११. साधारणतः दरवर्षी जून महिन्यात वसतीगृह प्रवेश प्रक्रीया सुरू होते, त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतीगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनविण्याचे काम सुरू आहे. ते कार्यान्वित नसल्यास गृहपाल/सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मुभा राहील. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यास स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ३० नोव्हेंबर पर्यंत राहील. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया उशीरा होईल, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर एका महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल.
१२. विद्यार्थ्यास शासकीय वसतीगृहात मिळालेला प्रवेश रद्द करून म्हणजेच वसतीगृहातील जागा रिक्त करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही.
१३. वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमतः वसतीगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल व तद्नंतर गुणानुक्रमेच स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
१४. सदर योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील तृतीयपंथी (Transgender) पात्र असतील.
स्वाधार योजना शैक्षणिक निकष
१. सदर विद्यार्थी इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
२. विद्यार्थी स्थानिक नसावा (ज्या महाविदयालय/शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविदयालय / शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका/नगर पालिका/ ग्रामपंचायत/कटक मंडळे यांच्या हद्दीत आहेत त्या महानगर पालिका/नगर पालिका/ ग्रामपंचायत / कटक मंडळे / तालुक्यातील रहीवासी नसावा.)
३. महानगर पालिकेच्या हद्दीपासुन ०५ कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीसुध्दा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
४. स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षात किमान ५० टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/CGPA असणे अनिवार्य आहे. त्यापूर्वीच्या इतर परीक्षेच्या गुणांचा विचार करण्यात येवू नये.
५. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
६. इयत्ता १२ वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा. (संबंधित अभ्यासक्रम शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुज्ञेय असावा.)
७. शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार योजनेस पात्र ठरतो. शासकीय वसतीगृह प्रवेश नियमावलीनुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देता येत नाही. तथापि, विद्यार्थ्यांने स्वाधार योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासून केवळ स्वाधार योजनेवा पुढील काळाकरीता लाभ देता येईल.
८. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (पदवी/पदव्युत्तर) प्रवेश घेतला असल्यास स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. (उदा. अभियांत्रिकेच्या पदवी बी.ई. नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यास स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.)
९. बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तरला लाभ अनुज्ञेय राहील. (उदा. बी.ए. नंतर एल.एल.बी., बी.ए. नंतर बी.एड, बी. कॉम. नंतर एम.बी.ए.)
१०. या योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यांना ३% आरक्षण असेल. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४०% इतकी राहील, त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
११. स्वाधार योजनेंतर्गत महिलांसाठी ३०% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय राहील.
१२. स्वाधार योजनेंतर्गत निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र होईल. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्याक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
१३. या योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही.
क) इतर निकष
१. सदर योजनेचा लाभ इयत्ता १० वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस अनुज्ञेय राहील. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त ७ वर्षे या योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी पुढील लाभास पात्र राहील. तथापि, उपरोक्त ०७ वर्षांचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशा दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ८ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. याकरीता विद्यार्थ्याला स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्यासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील.
२. स्वाधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदव्युत्तर पदवी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटीकेटी (ATKT) प्राप्त झाली असेल त्या विद्यार्थ्यांला फक्त एकदाच या अटीतून सूट देण्यात येईल. (म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यास दुसऱ्यावेळेस एटीकेटी (ATKT) मिळाल्यास तो विद्यार्थी सदर योजनेचा पुढील लाभ घेण्यास अपात्र असेल)
३. अभ्यासक्रमाच्या मध्यावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभास पात्र राहील.
४. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र असेल. तथापि, शिक्षणातील खंड हा २ वर्षापेक्षा जास्त असू नये, तसेच योजनेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.
५. विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना किंवा व्यावसायिक पाठ्यक्रमाशी सलंग्न असणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना या तीन योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल. जर एकच विद्यार्थी एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ एकाच कालावधीत घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थी फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील व लाभार्थी विद्यार्थ्याने जो आर्थिक लाभ घेतला आहे ती रक्कम १२% व्याजासह वसूल करण्यात येईल.
६. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
७. विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परिक्षेचा निकाल १५ दिवसांचे आत संबधित गृहपालांना सादर करणे बंधनकारक असेल.
८. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी/व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व सदर योजनेंतर्गत दिलेल्या लाभाच्या रक्कमेची १२% व्याजासह वसुली करण्यात येईल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आवश्यक कागदपत्रे
१. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे पतिज्ञापत्र (नोटरी).
२. विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.
३. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
४. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा.
५. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा