Election Duty : भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद व विधानसभेच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी वर्ग निवडणूक कर्तव्यार्थ नेमण्यात येतो.
निवडणूक कर्तव्ये ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण कर्तव्यापेक्षा वेगळया प्रकारची असतात व ती केवळ मर्यादीत वेळेत पूर्ण करत असताना त्यांना जोखीम आणि धोका यांचा सामना करावा लागतो.
निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या कुटुबियांना सहानुभूतिपूर्वक विचार करुन संदर्भाधिन क्र.२ येथे नमूद करण्यात आलेल्या दिनांक ११.०४.२०१९ च्या शासन निर्णयान्वये सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात येते.
निवडणूक कर्मचारी सानुग्रह अनुदान
भारत निवडणूक आयोगाच्या दि.२२.०७.२०२० च्या पत्रान्वये निवडणूक कर्तव्यार्थ असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान अदा करण्यासंदर्भात “कोव्हीड- १९ आजाराने मृत्यू” या बाबीचा समावेश करणे आणि निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसहीत CAPF व BEL/ECIL अभियंते/अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश करणेबाबत निर्देश दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या दि.१४.०९.२०२० च्या पत्रान्वये निवडणूक कर्तव्यार्थ असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान अदा करण्यासंदर्भात “ईव्हीएम / व्हीव्हीपॅट तयारीच्या सर्व प्रक्रियेदरम्यान नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी/कर्मचारी/अभियंते यांना मतदान अधिकारी / कर्मचारी म्हणून समजण्यात यावे आणि त्यानुसार त्यांना सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहील” असे समावेशन करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
Election Duty Sanugrah Anudan
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संदर्भाधिन समक्रमांकाच्या दिनांक ११.०४.२०१९ च्या शासन निर्णयात पुढीलप्रमाणे बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
- निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना मृत पावलेले अधिकारी/कर्मचारी यांचे वारस – १५ लाख रुपये
- निवडणुकीच्या वेळी कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट, सुरुंग अथवा शस्त्रास्त्राचा हल्ला (Road Mines, Bomb Blasts, Armed Attach etc.) यामध्ये मृत पावलेले अधिकारी/कर्मचारी यांचे वारस – ३० लाख रुपये
- निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना कायमस्वरुपी अपंगत्व आलेले अधिकारी / कर्मचारी (उदा. हात, पाय किंवा डोळा गमविणे इ.) – ७ लाख ५० हजार रुपये
- निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया, नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट, सुरुंग पेरणी, शस्त्रास्त्राचा हल्ला इ. (Road Mines. Bomb Blasts, Armed Attack etc.) यामध्ये कायमस्वरुपी अपंगत्व आलेले अधिकारी/ कर्मचारी (उदा. हात, पाय किंवा डोळा गमविणे इ.) – १५ लाख रुपये
सदर शासन निर्णयानुसार निवडणूक कर्तव्य याचा अर्थ संबंधीत अधिकारी/कर्मचारी हे निवडणुकीच्या कर्तव्यासाठी आपल्या घरातून / कार्यालयातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधीत कर्तव्ये पार पाडून आपल्या कार्यालयात घरी परत येईपर्यंतचा कालावधी असा समजण्यात येईल.
निवडणुकीशी संबंधीत कर्तव्ये यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असा आहे. याबरोबरच आता ईव्हीएम / व्हीव्हीपॅट तयारीच्या सर्व प्रक्रियेदरम्यान नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी/कर्मचारी/अभियंते यांना मतदान अधिकारी/ कर्मचारी म्हणून समजण्यात येते,त्यानुसार त्यांना या शासन निर्णयातील सानुग्रह अनुदानाचे लाभ अनुज्ञेय राहतील.
शासन निर्णयातील परिच्छेद ३ नुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी ( यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय इतर प्राधिकरण तसेच इतर खाजगी आस्थापना की, ज्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. असे अधिकारी / कर्मचाऱ्यांसहीत केंद्रीय सशत्र पोलीस दल CAPF (Central Armed Police Forces) व BEL / ECIL (Bharat Electronics Limited / Electronic Corporation of India Limited) अभियंते / अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे.
सदरील आदेश दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२१ पासून लागू आहे.सदरील आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक १७/२०२१/व्यय-४.दिनांक १९.०१.२०२१ नुसार निर्गमित करण्यात आला असून सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.